मोलगी येथील वसाहत

आज आपल्याला जी मोलगी दिसते ती आधी तशी नव्हती. आठ-दहा कौलारु छप्परांशिवाय तेथे काहीही नव्हते. दळणवळणाची सोय नव्हती म्हणून सरकारी कर्मचारी येत नसे. सन १९५९-६० मध्ये मोलगी भागासाठीचे गट विकास कार्यालय अक्कलकुवा येथे सुरु होते. त्या भागातील लोकांसाठी ते गैरसोयीचे होते. अक्कलकुवा पंचायत समितीचा विरोध असल्यामूळे ते ऑफीस मोलगी येथे येत नव्हते. मा.महाराजांनी महाराष्ट्र शासनाशी पत्रव्यवहार करुन ते ऑफीस मोलगी येथे आणले. परंतू त्यासाठी त्या कर्मचारी वर्गासाठी तेथे राहण्यासाठी घरांची आवश्यकता होती. मा.महाराजांनी गांवकरींच्या मदतीने १३ छप्परे तयार करुन दिली. तसेच अक्कलकुवा व तळोदा येथून एक न्हावी, किराणा दुकान व एक खानावळ उपलब्ध करुन दिली तेही १५ दिवसांच्या आत. आणि अशा प्रकारे मोलगी या बाजारपेठेच्या गावाची ख-या अर्थाने स्थापना झाली.
ज्या लोकांसाठी ते अहोरात्र झटत आहेत त्यांना या त्यांच्या महान कार्याची जाण तरी आहे काय ? हे ते अधुनमधून चाचपडून पाहतात. कधी-कधी त्यांना येत असलेल्या अनुभवांवरुन हे सर्व बंद करुन टाकावे असे वाटते परंतू समाजसेवेचा घेतलेला वसा त्यांना अर्ध्यातच सोडून देता येत नाही. तहहयात समाजसेवा करीत राहण्याचा संकल्प केलेला असल्याने ते आज वयाच्या ८४ व्या वर्षीही ही जबाबदारी कोणालाही सोपवू इच्छीत नाही. ते म्हणतात “मला ही जबाबदारी कोणी सोपवीली? माझी मीच घेतली, तशी कोणीही घ्यावी. मी सोपविणारा कोण?” त्यांच्या या साध्या परंतू मार्मिक प्रश्नांमध्ये प्रत्येकासाठी आदिवासी समाजाच्या सेवेसाठीची हाक दिसून येते.
Comments